फलटण चौफेर दि २३ ऑक्टोबर २०२५
सातारा जिल्हा नेहमीच शूरवीरांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा आणि देशरक्षकांचा मानाचा जिल्हा राहिला आहे. याच साताऱ्याच्या भूमीत, कोरेगाव तालुक्यातील भाडळे हे गाव आजही लष्करी परंपरेचा वारसा अभिमानाने जपत आहे.वाठार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर वांगणा नदीच्या काठावर वसलेले भाडळे गाव चारी बाजूंनी महादेव डोंगररांगा आणि निसर्गाच्या सान्निध्यात आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव स्वावलंबी असून येथे सरकारी शाळा, आरोग्य केंद्र, बँका, दवाखाने, बाजारपेठ अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.परंतु या गावाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे येथील लष्करी परंपरा — पिढ्यान् पिढ्या देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण करणारे सैनिक या गावाने घडवले आहेत.
भाडळ्याच्या रणशूरांचा इतिहास
या गावातील पहिले सैनिक कै. गणपत सिताराम भारती यांनी ब्रिटिश काळात दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने ब्रिटिश सरकारकडून त्यांना मेडल्स आणि रायफल बहाल करण्यात आली होती. त्यांच्या प्रेरणेतून अनेक तरुण सैन्यात दाखल झाले.स्वातंत्र्यानंतरही भाडळ्याच्या रणशूरांनी चीन, पाकिस्तान आणि १९७१ च्या भारत–पाक युद्धात भाग घेतला. कै. ज्ञानदेव सुतार यांनी या युद्धात शौर्याने लढत प्राणार्पण केले. त्यांच्या स्मारकाचे दर्शन गावाच्या प्रवेशद्वारावर आजही देशभक्तीची प्रेरणा देते.मराठा लाईट इन्फंट्रीचे कै. हनुमंत शंकर भारती हे युद्धात पोटाला गोळी लागून जखमी झाले तरी मोर्चा सोडला नाही. तसेच श्री राजाराम अनभूले आणि कॅप्टन कै. मुरलीधर राक्षे यांनी १९७१ आणि श्रीलंकेतील शांतता मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली.१९९९ च्या कारगिल युद्धात सुभेदार तानाजी मोहिते यांनी तोलोलींग येथे शौर्य दाखवले.
बॉम्बे इंजिनियरिंग रेजिमेंटच्या अनेक जवानांनी, जसे की रमेश लोटके, काशिनाथ काजळे, प्रकाश भारती, रवी भारती, युद्धात सहभाग घेऊन विजयात मोलाचे योगदान दिले.
नौदल व वायुदलातील योगदान
गावातील भगवान दीक्षित हे भारतीय नौदलातील पहिले सैनिक ठरले. त्यांनी विक्रांत, निलगिरी आणि उदयगिरी या जहाजांवर सेवा बजावत राष्ट्रपतींकडून प्रशस्तीपत्रक प्राप्त केले. तसेच दाजी घोरपडे व देशमुख यांनी नौदलात उल्लेखनीय सेवा बजावली आहे.वायुदलात बापू घोरपडे व नारायण ताटपूजे यांनी देशसेवा केली असून, तोफखान्यातील सूर्याजी घार्गे, मानसिंग मोहिते व विश्वास मोहिते यांनी ब्ल्यू स्टार आणि कारगिल युद्धात सहभाग घेतला.
गावाचा विकास आणि सैनिकांची भूमिका
सध्या सुमारे १५–२० तरुण देशाच्या विविध सीमांवर कार्यरत आहेत — लेह लडाख, आसाम आणि वाघा सीमेवर भाडळ्याचे सैनिक देशाचे रक्षण करीत आहेत. गावात सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, स्वच्छता आणि विकास कामांत सेवानिवृत्त सैनिक सक्रिय भूमिका निभावतात.
गावातील शंभरहून अधिक सेवानिवृत्त सैनिक एकत्र येऊन संघटनात्मक पातळीवर कार्यरत आहेत. शासनाने या गावात “सेना भवन” उभारावे, जेणेकरून आरोग्य शिबिरे, रक्तदान, योगा क्लास आणि सैनिक कल्याणाचे उपक्रम राबवता येतील, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
‘लष्करी गाव’ दर्जाची मागणी
जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी साताऱ्याच्या आपशिंगे गावाला ‘लष्करी गाव’चा दर्जा दिला, तसा दर्जा भाडळे गावालाही मिळावा, अशी गावकऱ्यांची सामूहिक इच्छा आहे.
लेखक :
श्री. अशोक भारती,
निवृत्त पोलीस उपअधीक्षक, पुणे.


